वाचक लिहितात   

वीज बचतीची सवय लावून घ्यावी
 
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून वीज दरामध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एक एप्रिलपासून नवे दर लागू होणार असून यामुळे वाढत्या वीजदरांमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह औद्योगिक, वाणिज्यिक क्षेत्रातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने येणारे आर्थिक वर्ष २०२५-२६ ते आर्थिक वर्ष २०२९-३० साठीच्या बहुवर्षीय दर (मल्टी इयर टॅरिफ) प्रस्तावाला मान्यता दिल्यामुळे एक एप्रिलपासून राज्यात विविध ठिकाणी वीजपुरवठा करणार्‍या महावितरण व अदानी कंपनीचे वीजदर सरासरी १० टक्के, टाटा कंपनीचे १८ टक्के, तर बेस्टचे वीजदर ९.८२ टक्क्यांनी कमी होणार आहेत. टाटा पॉवरच्या वीजदर पुढील पाच वर्षांमध्ये २८ टक्क्यांपर्यंत कपात होऊ शकते. पुढील पाच वर्षांत सौर ऊर्जा, पवनशक्ती ऊर्जा इत्यादी अपारंपरिक क्षेत्रातील स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने वीजदर कमी होणार आहेत. असे असले तरी वीज दरातील कपातीमुळे हुरळून न जाता प्रत्येक जबाबदार नागरिकाने स्वत:ला वीज बचतीची सवय लावून घेणे गरजेचे आहे. घरातील टीव्ही, पंखे आणि विजेचे दिवे गरज नसेल तेव्हा आवर्जून बंद करावेत, विजेचा अनावश्यक वापर टाळावा.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई    
 
बिहारमध्ये एनडीएला संधी? 
 
बिहारमध्ये या वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अलीकडे हरयाणा व महाराष्ट्रात एनडीएने बहुमत मिळविले. त्यामुळे साहजिकच या पुढील विधानसभेच्या निवडणुकात बाजी मारण्याची एनडीएची इच्छा आहे. बिहारमधील घडामोडीसंबंधी अमित शहा यांनी दिल्लीत नुकतेच विचारमंथन केले. त्यांनी तेथे सांगितले की, जे पाच पक्ष मिळून एनडीए बिहारमध्ये सत्तेवर आहे, तेथे त्यांनी एनडीएला पुढील निवडणुकांत मतदान करावे. नितीशकुमार हे सध्या मुख्यमंत्री आहेत. नितीशकुमार यांनी अनेक वेळा पक्ष बदल केला आहे. त्यामुळे यापुढे ते काय करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे; पण नुकतेच त्यांनी अमित शहा यांच्या समोर मी दोन वेळा मुख्यमंत्री पदासाठी विरोधी आघाडीत सामील झालो, आता असे होणार नाही, असे नितीशकुमार यांनी जाहीररित्या सांगितले आहे. अर्थात यामुळे येणारी निवडणूक नितीशकुमार यांचा जेडीयू व भाजप एकत्रितरित्या लढविणार हे निश्चित आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांची अनेक ठिकाणी लोकप्रियता आहे. त्याचा फायदा भाजपला निश्चित मिळेल. त्यामुळे जर हे दोन्ही पक्ष एकत्रित लढले, तर त्यांचे सरकार तेथे निश्चितच येईल. 
 
शांताराम वाघ, पुणे 
 
विकासनिधी देताना ’मी’पणा नको
 
रत्नागिरी मतदारसंघातील करबुडे येथील कार्यक्रमात उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी सामान्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावताना म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना करबुडेसारख्या गावाला मी साडेआठ कोटी रुपये दिले. या वक्तव्यात तसे वावगे काही नाही. लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर आणि त्यातच पालकमंत्री असल्यामुळे संबंधित प्रभागाला विकासनिधी देणे हे आलेच; पण तो देत असताना आणि त्याची जाहीर वाच्यता करत असताना ’मी’पणा डोकावू न देणे महत्वाचे असते. हा विकासनिधी लोकप्रतिनिधी स्वत:च्या खिशातून देत नसतात. तर तो त्यांना मिळणारा निधी असतो जो त्यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी वापरायचा असतो. त्यामुळे विकासनिधी देताना लोकप्रतिनिधींनी याचे भान जरुर ठेवावे.
 
दीपक गुंडये, वरळी.
 
पोहताना काळजी घ्या
 
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उत्साही तरूण मुले पोहायला जातात. खरे म्हणजे नदी, तलाव, बंधारे, सुरक्षित असेल असे नाही. एखाद्या ठिकाणी पोहायला जायचे असेल तर त्या ठिकाणाची माहिती घ्यायला हवी. पाण्याचा प्रवाह कसा आहे हे बारकाईने पाहिले पाहिजे. तलाव असो किंवा नदी सोबत पोहायला जाताना चार पाच पट्टीची पोहणारी माणसे सोबत असावीत. आपण पोहोताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. पोहता येणे ही जीवनावश्यक कला असून ती आत्मसात करणे गरजेचे आहे.
 
संतोष शिंदे, मु.पो.काष्टी, ता.श्रीगोंदे
 
मुक्या जीवांची तहान भागवा
 
राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आली असून अनेक शहरांचे तपमान ४० अंशाच्या घरात पोहचले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी. या उष्णतेच्या लाटेचा जितका त्रास नागरिकांना होत आहे, तितकाच त्रास प्राणी आणि पक्षांना देखील होत आहे. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटल्याने पशू पक्षी मानवी वस्तीकडे प्रस्थान करू लागले आहेत. अशा वेळी या मुक्या जीवांची तहान भागवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळेच प्रत्येकाने पशुपक्षांसाठी पाण्याची सोय करायला हवी. प्राणी आणि पक्षी यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पाणी पिता येईल अशा पद्धतीने गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवायला हवे.
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे

Related Articles